
उत्थान खोब्रागडे आणि ओम राऊत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र; शिस्त आणि परिश्रमाचे यश
गडचिरोली : युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित विभागस्तरीय कॅरम स्पर्धांमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या दोन विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर विजय मिळवून राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
नागपूर विभागातून अनेक स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या उत्थान खोब्रागडे (वर्ग ८ वी), ओम राऊत (वर्ग १० वी) या दोन प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड झाली. या दोन्ही विद्यार्थ्यांनी अचूक खेळ, एकाग्रता आणि उत्कृष्ट रणनीतीचे दर्शन घडवले. कठीण प्रतिस्पर्धकांशी लढत त्यांनी आपल्या शांत व आत्मविश्वासपूर्ण खेळाने परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
संस्थेचे सचिव धर्मरावबाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “शिस्त, परिश्रम आणि संघभावना या मूल्यांच्या आधारे गोंडवाना सैनिकी विद्यालयातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश मिळवत आहेत.”
मुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, क्रीडा शिक्षक भूपेंद्र चौधरी आणि कॅरम प्रशिक्षक कैलाश उपाध्ये तसेच सर्व शिक्षकवर्गाने या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “विद्यालयाचे विद्यार्थी केवळ शैक्षणिकच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सातत्याने यश मिळवत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
या यशाने विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक उजळला असून, हे दोन्ही विद्यार्थी आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट प्रदर्शन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



