गडचिरोलीविदर्भ

व्यसन उपचार क्लिनिकद्वारे ५६ रुग्णांचे समुपदेशन

गडचिरोली : दारूचे सेवन केवळ शारीरिक आरोग्यास हानिकारक नसून, त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतो. समाजात वाढणाऱ्या या व्यसनावर आळा घालण्यासाठी ‘मुक्तीपथ’तर्फे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील आठवड्यात व्यसन उपचार क्लिनिकमध्ये ५६ रुग्णांनी सहभाग नोंदविला आहे.

व्यसन उपचार क्लिनिकमध्ये केवळ औषधोपचारच दिले जात नाहीत, तर रुग्णांचे मानसिक समुपदेशन करण्यावर विशेष भर दिला जातो. दारूच्या अतिसेवनामुळे यकृत, हृदय आणि मज्जासंस्थेवर होणारे गंभीर परिणाम रुग्णांना पटवून दिले जात आहेत. तज्ज्ञांमार्फत रुग्णांची इच्छाशक्ती प्रबळ करणे आणि त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या क्लिनिकच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मागील आठवड्यात आरमोरी व देसाईगंज क्लिनिकमध्ये प्रत्येकी १० रुग्ण, चामोर्शी ९ रुग्ण, धानोरा व अहेरी येथे प्रत्येकी ८ रुग्ण, कोरची ७ तसेच एटापल्ली येथे ४ रुग्णांनी उपचार घेतला.

ही क्लिनिक सेवा जिल्ह्यातील बाराही तालुका मुख्यालयात कार्यान्वित आहे. नियोजित दिवशी तज्ज्ञ टीम आणि समुपदेशक उपस्थित राहून रुग्णांच्या समस्या जाणून घेतात. “व्यसन हे एक आजार असून त्यावर योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाने मात करता येते,” हा संदेश या उपक्रमातून घराघरांत पोहोचवला जात आहे. ज्या नागरिकांना व्यसनाची सवय सोडायची आहे, त्यांनी आपल्या जवळच्या तालुका केंद्रावर जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button