क्राईमनागपूरविदर्भ

छेडछाड प्रकरणात कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी ; महिला पीएसआयला अटक

नागपूर: छेडछाड प्रकरणात कारवाई न करण्यासाठी एका व्यक्तीकडून १० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनकेला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी एका महिलेकडून कामाच्या कमिशनचे पैसे न मिळाल्याने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान संबंधित महिलेने उलट तक्रारदार यांच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार दाखल केली. या छेडछाडीच्या अर्जावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी वाठोडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांनी एका खाजगी इसमामार्फत २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरुवातीला २०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नागपूर एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

एसीबीच्या पथकाने ६ मार्च २०२६ रोजी या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान, पीएसआय प्रणाली बेनके यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केली, परंतु तडजोडीअंती १० हजार रुपये वाठोडा पोलीस ठाण्यात स्वीकारण्याचे मान्य केले. मात्र, त्यानंतर बेनके यांना तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी ती लाचेची रक्कम स्वीकारली नाही. लाचेची रक्कम प्रत्यक्ष स्वीकारली नसली, तरी पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे एसीबीने २ जून रोजी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांना ताब्यात घेतले. सध्या वाठोडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक शुभांगी वानखेडे यांच्या पर्यवेक्षणात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविन्द्र सहारे, पोलीस निरीक्षक वैशाली आठवले, महिला पोलीस हवादार अस्मिता मल्लेलवार, सरिता मेश्राम, अनिल बहिरे, पोलीस नाईक मिलिंद मेश्राम आणि चालक महिला पोलीस शिपाई हर्षलता भरडकर यांनी ही कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button