
गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे २५ ऑक्टोबर २०२५ पासून टप्प्याटप्प्याने बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढणार असून, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, चामोर्शी मुख्यालयापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या आणि जून २०१८ मध्ये पूर्ण झालेल्या चिचडोह बॅरेजवर १५ मीटर लांबीचे आणि ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी दरवाजे बसवलेले आहेत. २५ ऑक्टोबर २०२५ पासून द्वारसंचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदीकाठावरील व क्रमाने नदीच्या मध्यभागातील) हे सर्व दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. यामुळे नदी पात्रात तसेच उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होऊन पाण्याची पातळी वाढणार आहे.
पाणीपातळी वाढल्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ नये म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील कुरूड, रामपूर, विसापूर, निमगांव, खोर्दा, हिवरगांव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगांव (रै.), आमगांव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, डोटकुली, डोंगरगांव (बु.), शिवणी, मुडझा (बु.), पुलखल या गावांचा समावेश आहे. तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सर्व लगतच्या गावांमधील ग्रामपंचायतींनी दवंडीद्वारे गावकऱ्यांना सूचित करावे. नदीकाठावरील शेतांमध्ये काम करताना सतर्कता बाळगावी. मासेमारी करणारे, पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. अशा सुचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे आणि नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आवश्यक खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



