कसनसूर फळ रोपवाटिका बनणार आदर्श केंद्र : ‘फळबाग हब’ निर्मितीकडे जिल्ह्याची वाटचाल

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
गडचिरोली : जिल्ह्याची ओळख आता केवळ खनिजसंपत्ती आणि ‘स्टील हब’पुरती मर्यादित राहणार नाही, तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या ‘फळबाग हब’ म्हणूनही जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एटापल्ली तालुक्यातील अति दुर्गम कसनसूर येथील १० हेक्टर शासकीय फळ रोपवाटिका जिल्ह्याच्या विकासाचे नवे केंद्र बनणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी नुकताच या रोपवाटिकेला भेट देऊन सविस्तर आढावा घेतला आणि या रोपवाटिकेला आदर्श केंद्र बनवण्याचे निर्देश दिले.
गेल्या तीन वर्षांपासून कसनसूर रोपवाटिकेत काजू, आंबा, चिकू, पेरू, सिताफळ आणि चिंच यांसारख्या फळपिकांची कलमांद्वारे रोपे तयार करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. विशेष म्हणजे, काजू व कोको संचालनालय, केरळ यांच्या सहकार्याने कृषी विभागाने एटापल्ली, अहेरी, भामरागड आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये ६०८ हेक्टर क्षेत्रावर काजू लागवडीचा विस्तार केला आहे.
दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी फळबाग एक वरदान
अहेरी उपविभागातील हवामान कोकणाप्रमाणे उष्ण आणि दमट असल्याने फळबाग लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. मात्र, दुर्गम भागातील दळणवळण आणि संपर्क सुविधांच्या अभावामुळे येथील शेतकरी प्रामुख्याने भातशेतीवर अवलंबून होते. आता कृषी विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे शेतकरी विविध फळबाग पिके तसेच बांधावरील नाचणी, तूर, तीळ आणि कापसासारख्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. फळबाग लागवडीमुळे कार्बन क्रेडिटचा लाभ घेण्याचीही संधी उपलब्ध होत असून, यामुळे उद्योग आणि शेती यांचा समन्वय साधून संतुलित विकास साधता येणार आहे.
कसनसूर रोपवाटिका: भविष्यातील काजू-आंबा-चिकू हबचे प्रवेशद्वार
कसनसूर रोपवाटिकेत तीन वर्षांपूर्वी वेंगुर्ला-४, ७ व ९ या काजूच्या जातींची मातृवृक्ष बाग उभारण्यात आली आहे. लवकरच येथे केशर आंब्याची मातृवृक्ष बाग देखील विकसित होणार आहे. यामुळे भविष्यात गडचिरोली जिल्हा ‘काजू-आंबा-चिकू हब’ म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिरळकर यांनी रोपवाटिकेच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि भविष्यातील विकासासाठी एक व्यापक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या आराखड्यात कुंपण, प्रशिक्षण केंद्राची दुरुस्ती, शेडनेट, प्लास्टिक टनेल, सौरऊर्जेवर आधारित वीज निर्मिती युनिट यांसारख्या अत्यावश्यक बाबींचा समावेश करून कसनसूर रोपवाटिकेला खऱ्या अर्थाने एक आदर्श केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.



