नागपूरविदर्भ

सेवाभावाच्या संकल्पाने महावितरणचा २१ वा वर्धापन दिन साजरा ; अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली ‘विद्युत सुरक्षेची’ शपथ

‘ग्राहक देवो भव’ मंत्रावर विशेष भर; शिवरायांच्या ३५३ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन, मुंबईतील मुख्य सोहळ्याचे झाले थेट प्रक्षेपण

नागपूर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवून राज्याच्या विकासाला गती देणाऱ्या महावितरण कंपनीचा २1 वा वर्धापन दिन नागपूर परिमंडलाच्या वतीने येथील ‘विद्युत भवन’ कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, यंदाचा वर्धापन दिन कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने, परंतु ग्राहकाभिमुख सेवाभावाचा दृढ संकल्प करत साजरा करण्यात आला.

नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या यंत्रणेला अधिक पारदर्शक, गतिमान आणि सुरक्षित करण्याचा निर्धार करण्यात आला.

यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्ष असल्याने, कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या पुतळ्याला आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन करून करण्यात आली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याने या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘विद्युत सुरक्षेची’ सामूहिक शपथ घेतली. ‘अपघातमुक्त महावितरण’ हे मुख्य ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक स्तरावर सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा आणि तांत्रिक बाबींमध्ये अधिक अचूकता आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी ‘ग्राहक देवो भव’ या महावितरणच्या मूळ मंत्रावर विशेष भर दिला. ग्राहकांना २४ तास अखंडित, दर्जेदार आणि सुरक्षित वीज सेवा पुरविणे, त्यांच्या तक्रारींचे तत्परतेने जागेवरच निवारण करणे आणि महावितरणच्या सौर ऊर्जेसारख्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यासोबतच, कंपनीची गळती रोखून तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि तांत्रिक कार्यक्षमता वाढवून व्यावसायिक स्तरावर महावितरणला अधिक बळकट करण्याचे ध्येय यावेळी निश्चित करण्यात आले.

नागपूर येथील विद्युत भवनमधील या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबई येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाचे करण्यात आलेले थेट ऑनलाइन प्रक्षेपण होते. या प्रक्षेपणाद्वारे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यभरातील कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. या प्रसंगी संचालक (संचलन/प्रकल्प) सचिन तालेवार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनीही ऑनलाईन प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी आपल्या भाषणात महावितरणच्या गेल्या २१ वर्षांतील आव्हानात्मक आणि यशस्वी वाटचालीचा आढावा घेत सर्व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी नागपूरचे अधीक्षक अभियंते अमित परांजपे, संजय वाकडे आणि दिपाली माडेलवार यांनीही उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.

या वर्धापन दिन सोहळ्याला नागपूर परिमंडळ कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, शहर व ग्रामीण मंडळ, पायाभूत आराखडा विभाग, स्थापत्य मंडळ, भरारी पथक आणि चाचणी व सुरक्षा विभागातील वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button