गडचिरोलीविदर्भ

आरमोरीत ‘धोकादायक इमारतीं’चा प्रश्न ऐरणीवर; नगर परिषदेचा केवळ ‘नोटीस’चा खेळ, नागरिक संतप्त

आरमोरी : हवामान विभागाने आगामी काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. निसर्गाच्या या बदलत्या रूपाच्या पार्श्वभूमीवर आरमोरी नगर परिषद क्षेत्रातील जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जीर्ण इमारती नागरिकांच्या जिवावर उठण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने संबंधित घरमालकांना केवळ नोटीस बजावून आपले हात झटकले असले, तरी प्रत्यक्षात मात्र अनेकांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. “यामुळे जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता शहरातील नागरिक विचारत आहेत.

सध्या आरमोरी शहराच्या विशेषतः जुन्या वस्तीत आणि अनेक प्रभागांमध्ये अत्यंत जीर्ण झालेल्या, केव्हाही पत्त्यासारख्या कोसळू शकतील अशा इमारती उभ्या आहेत. या इमारतींमध्ये आजही नागरिक जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे या इमारती कधीही भुईसपाट होऊन मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती वर्तविली जात आहे. मात्र, प्रशासन केवळ ‘नोटीस-नोटीस’चा खेळ खेळण्यात व्यस्त असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

गेल्या वर्षी आरमोरी शहरातील ‘लालानी’ यांची एक जीर्ण इमारत अचानक कोसळून तीन निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या थरारक आणि भीषण दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. त्यावेळी प्रशासनाने शहरातील एकही धोकादायक इमारत शिल्लक ठेवणार नाही, असे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. “प्रशासन आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची आणि निष्पाप बळींची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल मृतकांच्या कुटुंबीयांसह शहरवासी उपस्थित करत आहेत.

नोटीस मिळूनही घरे किंवा व्यावसायिक गाळे रिकामे न करणाऱ्या बेजबाबदार मालकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. केवळ कागदी घोडे न नाचवता, धोकादायक असलेल्या या इमारती प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन तत्काळ पाडण्याची (निष्कासित करण्याची) कारवाई करावी. आरमोरी शहरात दुसरी ‘लालानी इमारत दुर्घटना’ घडू नये, म्हणून स्थानिक प्रशासनाने वेळीच जागे होऊन या जीर्ण इमारतींवर तात्काळ हातोडा चालवावा, अशी आग्रही मागणी आरमोरीवासीयांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button