
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेवाडा पोलीस मदत केंद्र आणि मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करत २० लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू जप्त केली. याप्रकरणी दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेवाडा गावात दारूबंदी असूनही काही विक्रेते लपूनछपून हा अवैध व्यवसाय चालवत होते. यामुळे गावातील तसेच इतर ठिकाणचे मद्यपी येथे येत असल्याने गाव संघटनेकडूनही ही दारूविक्री थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर, पोलीस आणि मुक्तीपथच्या संयुक्त मोहिमेमुळे या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यश आले.
मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आकाश नाईकवाडी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मुक्तीपथतर्फे तालुका संघटक एस. जे. मेश्राम, जीवन दहीकर, महेश खोब्रागडे आणि यूवनाथ मेश्राम यांचा सहभाग होता.



