गोंदियाविदर्भ

कुष्ठरोग निर्मूलनासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’! ; विभागीय संचालक डॉ. प्रनील कांबळे यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

जिल्ह्याचा कुष्ठरोग निर्देशांक २.९८ वर; ‘सिंगल डोस रिफॅम्पिसिन‘ आणि जनजागृतीवर देणार भर

गोंदिया : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ज्या राज्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण दर १० हजार लोकसंख्येमागे २ पेक्षा जास्त आहे, तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. गोंदिया जिल्ह्याचा कुष्ठरोग पी.आर. (Prevalence Rate) निर्देशांक २.९८ इतका असल्याने, पुणे येथील कुष्ठरोग विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. प्रनील कांबळे यांनी जिल्ह्याचा दौरा करून आरोग्य यंत्रणेच्या कामाची सखोल पाहणी केली.

डॉ. प्रनील कांबळे यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात विविध आरोग्य केंद्रांना भेटी देऊन दप्तर तपासणी केली आणि प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला. जिल्हा परिषद गोंदिया येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांची भेट घेऊन दौऱ्याचे नियोजन केले. त्यानंतर गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा आणि ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे पाहणी केली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभीटोला, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव आणि आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कुंभीटोला येथे भेट दिली.

पाहणी दरम्यान डॉ. प्रनील कांबळे यांनी कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाच्या तांत्रिक उपाययोजनांवर प्रकाश टाकला: प्रतिबंधात्मक औषधोपचार (PEP): कुष्ठरुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना आणि शेजाऱ्यांना कुष्ठरोगाचा धोका कमी करण्यासाठी ‘सिंगल डोस रिफॅम्पिसिन’ देण्यात येणार आहे. सक्रिय शोध मोहीम: ज्या भागात कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त आहे, अशा हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन रुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. ३. डिजिटल मॉनिटरिंग: रुग्णांची नोंदणी आणि त्यांच्या उपचारांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत डिजिटल पोर्टलचा वापर केला जात आहे.

कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असण्यामागे ‘सामाजिक भीती’ हे एक मोठे कारण असल्याचे डॉ. कांबळे यांनी नमूद केले. “समाजात कुष्ठरोगाबद्दल असलेल्या चुकीच्या समजुतींमुळे आणि भीतीमुळे लोक सुरुवातीची लक्षणे लपवून ठेवतात. परिणामी, रोगाचे निदान उशिरा होते आणि प्रसार वाढत जातो. त्यामुळे जनजागृतीवर अधिक भर देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यात डॉ. कांबळे यांच्यासोबत सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. महेंद्र धनविजय, नोडल अधिकारी डॉ. भाग्यश्री गावंडे, फिजिओथेरपिस्ट डॉ. घनश्याम समरीत, संतोष बोरकर आणि संबंधित तालुक्यांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे – वेळीच सावध व्हा!

त्वचेवर विरळ, तेलकट किंवा फिकट रंगाचे डाग पडणे. डागांच्या ठिकाणी स्पर्शज्ञान (जाणीव) नसणे. हातापायांच्या नसा जाड होणे किंवा मुंग्या येणे. चेहऱ्यावर किंवा कानाच्या पाळीवर गाठी येणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button