गडचिरोलीविदर्भ

मादक द्रव्य नियंत्रण समितीद्वारे अवैध दारूविक्री बंद करा

आदिवासी दिनाच्या कार्यक्रमातून हजारो नागरिकांना आवाहन

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे पेंढरी,  दुधामाळा, झाडापापडा, खुटगाव, रांगी आदिवासी इलाका समितीच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुक्तिपथ धानोरा चमू कार्यक्रमाला उपस्थित होती. अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी एक होऊन आपल्या गावात मादक द्रव्य नियंत्रण समिती स्थापन करण्याचे आवाहन उपस्थित हजारो आदिवासी समाजबांधवांना करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मैनुजी जांगधुर्वे होते. उपाध्यक्ष झाडापापडाचे जमीदार दयाराम पवार, प्रमुख अतिथी म्हणून इलाखा माजी गुरु पाटील तसेच मार्गदर्शक म्हणून पावसू पावे, कोंडावाही ग्रामसभा अध्यक्ष देवाजी पदा, भरत येरमे, अरुण शेडमाके, माजी जिप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, पेंढरी शाळेचे मुख्याध्यापक सोमणकर यांच्यासह पेंढरी, दुधामाला, झाडापापडा, खुटगाव, रांगी इलाका, प्रत्येक गावातील गाव पाटील, जमीनदार, समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमात ग्रामसभा-संविधानिक हक्क, स्वतंत्र ग्रामसभा, स्वशासन सरकार, १५ ऑगस्टला पेसा अंतर्गत येणारे १७ विषय पारित करणे, मादक द्रव्य समिती प्रत्येक गावात तयार करणे आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. मुक्तिपथ चमूने गावातील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी व्यसन उपचार शिबीर, गावागावात ग्रामस्तरावर दारूबंदीचे ठराव पारित करणे. शक्तीपथ संघटन महिलांच्या माध्यमातून कृती करणे या कृतीमध्ये इतरांचा सहभाग असणे गरजेचे आहे याविषयी चर्चा केली. तसेच १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत गावागावात मादकद्रव्य नियंत्रण समिती गठीत करण्याचे आवाहन केले. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त धानोरा तालुक्यातील पेंढरी इलाका सभेत विविध ४० गावातील गाव पाटील, भूमिया पुजारी, ग्रामसभा अध्यक्ष, सचिव यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button