गडचिरोलीत ‘गोष्ट सुरू होते’ मराठी चित्रपटाचा शानदार मुहूर्त; ‘अस्तित्व स्टुडिओ’चा ऐतिहासिक पुढाकार

स्थानिक कलावंतांना मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ
गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने ‘अस्तित्व स्टुडिओ’ निर्मित ‘गोष्ट सुरू होते’ या मराठी चित्रपटाच्या शुभारंभाने आता सिनेसृष्टीत एक नवा आणि अभिमानास्पद अध्याय जोडला आहे. एकेकाळी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमणाऱ्या या भूमीत, आता कॅमेऱ्याचा ‘ॲक्शन’ शब्द घुमणार आहे. गडचिरोलीच्या मातीतील सुप्त कलागुणांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची ही एक मोठी आणि कौतुकास्पद झेप आहे.
जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील निसर्गरम्य आणि अतिदुर्गम अशा आलापल्ली आणि पेरमिल्ली येथे या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्याच्या दुर्गमतेवर मात करत, स्थानिक कलावंतांना चित्रपटसृष्टीकडे वळवण्याचा विडा ‘अस्तित्व स्टुडिओ’ ने उचलला आहे.
“गोष्ट सुरू होते” हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून, गडचिरोलीची ओळख केवळ नक्षलवादापुरती मर्यादित नसून, येथील नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि कला किती मोठी आहे, हे संपूर्ण देशाला दाखवणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटामुळे येथील स्थानिक कलाकारांना अभिनयाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून या जिल्ह्याच्या सुप्त प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा ‘अस्तित्व स्टुडिओ’चा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रमुख अतिथी म्हणून किष्टय्या नारायण गड्डमवार, मेडपल्लीचे सरपंच वेलादी, नीता सोमेश्वर रामटेके, यशोधरा यशवंत ढवळे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. चित्रपटाचे मुख्य निर्माता गजानन भिकाजी गेडाम व दिग्दर्शक राजेश ढवळे यांच्या नेतृत्वात सहनिर्माते चिरंजीवी किष्टय्या गड्डमवार, ज्ञानेश्वर नारायण मुठे, कुंतल खोजरे आणि मुख्य कार्यकारी निर्माता समीर रामटेके यांनी संपूर्ण चमूला प्रोत्साहन दिले.
डी.ओ.पी. स्मोहीत देशपांडे, ग्याफर, अनिरुद्ध वामन मुळीक, व्हीएफएक्स प्रमुख आयुष जैन आणि मेक-अप विभाग प्रमुख सरिता हटवार हे तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलमध्ये अभिनेता श्रीकांत पुरमवार आणि अभिनेत्री आर्या चंकापुरे यांच्यासह विशाल पिम्पलमुडे, बन्सी खोब्रागडे, अजय अंबाडरे, सम्राट वाने, राहुल धनवंते, वरून अमरावते, राहुल गुप्ता, साक्षी मगर, संतोष कापसे, धम्मप्रकाश, अमित दुर्गे, समीक्षा ढवले, रोशनी आणि समस्त ‘गोष्ट सुरू होते’ टीमने या नव्या प्रवासाची सुरुवात केली.
गडचिरोलीत चित्रपट निर्मितीसाठी झालेले हे पहिले पाऊल म्हणजे संघर्षातून साकारलेल्या कलेचा विजय आहे. हा चित्रपट केवळ एक गोष्ट सांगणार नाही, तर तो येथील लोकांच्या जिद्दीची, स्वप्नांची आणि विशेषतः स्थानिक कलागुणांची कहाणी असेल. ‘गोष्ट सुरू होते’ ही केवळ चित्रपटाची नव्हे, तर गडचिरोलीच्या नव्या आणि उज्ज्वल भवितव्याची गोष्ट आहे, जी ‘अस्तित्व स्टुडिओ’ च्या पुढाकाराने जगापुढे येणार आहे!



