गोंदियाविदर्भसामाजिक

बचत गटाच्या कर्जातून फुलला स्वयंरोजगार! ; तहसील कार्यालयातील ‘नाश्ता’ बनला गीताताईंच्या प्रगतीचा आधार

‘जीवनोन्नती’ अभियानामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहात मानाचे योगदान; महिला सक्षमीकरणाचे गडचिरोलीतील यशस्वी उदाहरण.

गोंदिया : “माणसाकडे जिद्द आणि हातामध्ये कौशल्य असेल, तर शासन मदतीचा हात नक्कीच पुढे करते,” याचे जिवंत उदाहरण म्हणजे गडचिरोलीतील गीता निर्विकार. ‘दिव्य ज्योती’ बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा योग्य वापर करून गीताताईंनी स्वतःचा छोटासा खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे. आज केवळ नाश्ता विक्रीतून त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा समर्थपणे पेलत असून, एक यशस्वी लघु उद्योजिका म्हणून समोर आल्या आहेत.

गडचिरोली तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी गीताताईंचा नाश्ता हा जणू घरची चव घेऊन येतो. दररोज सकाळी त्या गरम आणि ताजी इडली, ढोकळा किंवा अप्पे घेऊन कार्यालयात पोहोचतात. कार्यालयाच्या इमारतीत कॅन्टीन असले, तरी कामाच्या व्यापातून बाहेर जाणे शक्य नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी गीताताईंचा नाश्ता हा ‘भुकेची वेळ’ भागवणारा हक्काचा पर्याय ठरला आहे.

गीताताई ‘दिव्य ज्योती’ बचत गटाच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ (उमेद) अंतर्गत त्यांनी वैयक्तिक कर्ज घेतले. या कर्जातून त्यांनी नाश्ता तयार करण्यासाठी लागणारी सामग्री आणि साधने उपलब्ध केली. त्यांचे पती खाजगी नोकरी करतात, मात्र गीताताईंच्या या व्यवसायामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. त्यांच्या या व्यवसायाचा फायदा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी होत आहे.

केवळ नाश्त्यापुरते मर्यादित न राहता, गीताताईंच्या हाताला असलेल्या चवीमुळे त्यांना आता बाहेरूनही मागणी येत आहे. आपल्या काही मैत्रिणींच्या मदतीने त्या छोट्या-मोठ्या सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी जेवण तयार करून देतात. विशेष म्हणजे, व्यवसायातून होणाऱ्या नफ्यातून त्या घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात आणि भविष्यासाठी बचतही करत आहेत.

आपल्या यशाबद्दल बोलताना गीताताई अभिमानाने सांगतात की, “शासनाच्या योजनांमुळे मला ही संधी मिळाली. आज मी केवळ गृहिणी नसून एक उद्योजिका आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहात माझेही योगदान आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो.” त्यांनी या मदतीबद्दल राज्य शासनाचे आभार मानले आहेत. शासनाच्या जीवनोन्नती कार्यक्रमांतर्गत लाखो महिला आज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, गीताताईंचे हे उदाहरण ग्रामीण भागातील इतर महिलांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button