
बिहार आणि उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राची अव्वल स्थानी झेप ; घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरासाठी प्रती युनिट ८० पैसे सवलत
चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊर्जा परिवर्तनाला मोठे यश मिळाले असून, अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ग्राहकांना १०० टक्के अचूक बिल आणि दर तासाचा वीज वापर मोबाईलवर पाहण्याची सुविधा देणारे ८७.५७ लाख स्मार्ट मीटर राज्यात कार्यान्वित झाले आहेत. या विक्रमी कामगिरीत महावितरणने ८५.८५ लाख स्मार्ट मीटर बसवून सिंहाचा वाटा उचलला असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
स्मार्ट मीटर बसविण्याच्या बाबतीत दि. 10 फेब्रुवारीपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार 87.57 लाख स्मार्ट मीटरसह महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून बिहार (86.44 लाख) व उत्तर प्रदेश (82.75 लाख) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. स्मार्ट मीटर केवळ अचूकता देत नाहीत, तर ग्राहकांना पैसे वाचवण्याची संधीही देतात. ‘टाईम ऑफ डे’ (TOD) सवलतींतर्गत, ज्या वेळेत सौर ऊर्जेची उपलब्धता जास्त असते, त्या काळात वीज वापरल्यास ग्राहकांना सवलत मिळते.
घरगुती ग्राहक: जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ५४ लाख ४२ हजार ग्राहकांनी ५१ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ मिळवला आहे. इतर वर्गवारी: औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना याच कालावधीत २१५ कोटी ३५ लाख रुपयांची एकूण सवलत मिळाली आहे. उच्चदाब ग्राहक: मोठ्या उद्योगांना तब्बल १३४९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असून, यात औद्योगिक क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते किंवा दर वाढतात, हा गैरसमज महावितरणने खोडून काढला आहे. मोफत सुविधा: हे मीटर पूर्णपणे मोफत बसविले जात आहेत. तक्रारीत घट: रिडींगमध्ये मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारींचे प्रमाण आता केवळ ०.५ टक्क्यावर आले आहे. दर कपातीचा प्रस्ताव: महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे वीजदर कमी करण्यासाठी परवानगी मागितली आहे, ज्यामुळे ग्राहकांवरील बोजा आणखी कमी होईल.
राज्यातील ३०,१६४ विद्युत फीडर आणि २.८० लाख वितरण रोहित्रांवर (Transformers) स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामुळे वीज गळती रोखणे, मागणीचा अचूक अंदाज घेणे आणि एनर्जी ऑडिट करणे प्रशासनाला सोपे झाले आहे. वीज पुरवठ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
स्मार्ट मीटरचे प्रमुख लाभ: अचूकता: मानवी त्रुटीशिवाय १००% अचूक बिलिंग. मोबाईल ॲप: दर तासाचा वीज वापर मोबाईलवर पाहण्याची सोय. बचत: दिवसा वीज वापरल्यास प्रती युनिट ८० पैसे सवलत (टीओडी). नियोजन: अति वीजवापराची उपकरणे सवलतीच्या वेळेत वापरून बिल कमी करण्याची संधी.
राज्यात ९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान ‘स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा’ साजरा केला जात आहे. ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून आपल्या वीज वापराचे नियमित निरीक्षण करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.



