
शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित ; रिक्त पदे तात्काळ भरण्याची विश्वेश्वर दरो यांची मागणी
आरमोरी : तालुक्यातील कोरेगाव येथे मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय श्रेणी क्र. १ च्या दवाखान्यात कर्मचाऱ्यांच्या तीव्र अभावामुळे १६ गावांतील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर अशी तीन पदे मंजूर असली तरी, सद्यस्थितीत केवळ एकच पशुधन पर्यवेक्षक कार्यरत असल्याने संपूर्ण परिसराचा भार त्यांच्या एकट्यावर पडला आहे.
कोरेगाव आणि आजूबाजूच्या एकूण १६ गावांचा समावेश असलेल्या या दवाखान्यात परिसरातील शेतकरी आपली गुरेढोरे आणि इतर पाळीव प्राणी उपचारासाठी घेऊन येतात. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे जनावरांवर वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही. याचा परिणाम म्हणून पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजना आणि सेवांपासून वंचित राहावे लागत आहे.
काँग्रेस आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष विश्वेश्वर दरो यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, “शेतकरी आणि पशुपालकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात, परंतु कर्मचाऱ्यांअभावी पशुपालकांना या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.”
त्यांनी शासनाकडे तात्काळ पशुधन विकास अधिकारी आणि परिचर ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पशुपालकांना योग्य वेळी उपचार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल.



