गडचिरोलीविदर्भ

आष्टी पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी ; मुख्यमंत्री कृती कार्यक्रम योजनेत नागपूर विभागात द्वितीय क्रमांक

पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली १०० दिवसात उल्लेखनीय सुधारणा

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, नागपूर विभागात पोलीस निरीक्षक संवर्गात चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी १०० दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत करायच्या कामांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि पोलीस दलातील विविध कार्यालये व पोलीस ठाण्यांना सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने आष्टी पोलीस स्टेशनने कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता, तक्रार निवारण, नागरिकांचे जीवनमान सुलभ करणे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आवश्यक सुविधा व उपाययोजना करण्यात उत्कृष्ट कामगिरी केली. याचमुळे उपविभाग स्तरावर आष्टी पोलीस स्टेशनने सर्वोत्तम दुसरा क्रमांक मिळवला आहे.

या यशाबद्दल बोलताना आष्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विशाल काळे म्हणाले, “आम्ही १०० दिवसांच्या आत पासपोर्ट सेवा १०० टक्के वेळेत पुरवणे, चारित्र्य पडताळणी सेवा वेळेत देणे, स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबवणे, जुन्या प्रलंबित मालमत्तेचा निपटारा करणे, रेकॉर्ड अद्ययावत करणे आणि कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करून त्यांना अधिक सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केले. पोलीस स्टेशन आणि परिसरातील स्वच्छतेला नियमित महत्त्व दिल्याने पोलीस स्टेशन नेहमी स्वच्छ आणि सुंदर राहिले.”

पोलीस निरीक्षक काळे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांचे वेळोवेळी तपासकामादरम्यान मिळालेले मार्गदर्शनही आवर्जून नमूद केले.

मुख्यमंत्री कृती कार्यक्रम योजनेत गडचिरोली पोलीस विभागाने विविध सरकारी विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. आष्टी पोलीस स्टेशनच्या या यशाने पोलीस दलाची मान उंचावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button