
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. विनायक शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सविता सादमवार, जनसंवाद विभाग प्रमुख डॉ. सरफराज अंसारी, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कीर्तन, प्रवचन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जागृती घडवून आणली. ग्रामस्वच्छता, नशाबंदी, शिक्षण आणि नैतिक मूल्यांचा प्रसार यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळातही तितकीच आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करून त्यांचे स्मरण करण्यात आले.



