भंडाराविदर्भ

विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीला आग; तीन लहान मुले होरपळली

मोहदुरा गावात दुर्गा विसर्जनादरम्यान घडली दुर्घटना ; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

भंडारा : तालुक्यातील मोहदुरा गावात दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रात्री १० वाजताच्या सुमारास एक दुर्घटना घडली. ट्रॅक्टर ट्रॉलीवर निघालेल्या या मिरवणुकीदरम्यान जनरेटरमधील पेट्रोल सांडल्यामुळे अचानक आग लागली, ज्यात मूर्तीजवळ बसलेली तीन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत.

गावातील नवतरुण दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने ३ ऑक्टोबरला महाप्रसादानंतर दुर्गादेवीच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत दुर्गादेवीची मूर्ती आणि जनरेटर ठेवण्यात आला होता. डीजेमध्ये बिघाड झाल्याने तो सुरू होत नव्हता. त्यामुळे डीजे मालकाने जनरेटरमधील पेट्रोल तपासले. याच दरम्यान, काही प्रमाणात पेट्रोल ट्रॉलीमध्ये सांडले. ट्रॉलीत पाणी साचल्यामुळे हे पेट्रोल पाण्यावर पसरले आणि याचवेळी जनरेटर सुरू करताना क्षणार्धात ट्रॉलीला आग लागली. त्यामुळे मूर्तीजवळ बसलेली तीन लहान मुले गंभीर जखमी झाली. सार्थक राहुल मेश्राम (५ वर्षे), शिवम मुकेश फाये (८ वर्षे) आणि लक्ष प्रशांत वैरागडे (८ वर्षे), अशी भाजलेल्या मुलांची नावे आहेत. जखमी झालेल्या या तिन्ही मुलांना तातडीने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button