
दवडीपार येथे पंकज रहांगडाले यांच्या हस्ते उद्घाटन
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सलग तिसऱ्या वर्षाच्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या केंद्रस्तरीय स्पर्धांचा उद्घाटन सोहळा दवडीपार (जि. गोंदिया) येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री पंकज रहांगडाले यांच्या पुढाकाराने तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना रहांगडाले म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही प्रावीण्य मिळावे, यासाठी हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे.” या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मुले-मुलींना आपली कला व कौशल्ये केंद्रस्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर सादर करण्याची मोठी संधी मिळते. हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक केंद्रांवर केंद्रस्तरीय स्पर्धा जोरात सुरू असून, यातून निवड झालेल्या स्पर्धकांमधून लवकरच जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
यावेळी पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश कटरे, किशोर पारधी, माजी पंचायत समिती सदस्य साहेबलाल कटरे, राजकुमार रहांगडाले, सरपंच बी. एम. कटरे, उपसरपंच साहेबलाल बिसेन, मुख्याध्यापक सचिन राठोड, शालिकराम कटरे यांच्यासह दवडीपार केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रहांगडाले यांनी सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा देऊन प्रेरित केले.



