भंडाराविदर्भ

समाज कल्याण अभ्यासिकेतील दोन विद्यार्थ्यांची ‘मंत्रालय महसूल सहाय्यक’ पदी निवड

अभिषेक मेश्राम आणि राहुल बोकडे यांचे नेत्रदीपक यश ; समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांच्या हस्ते गौरव

भंडारा : सामाजिक न्याय विभाग, भंडारा अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने यशाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गट-क (Group-C) परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, या अभ्यासिकेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांची थेट मुंबई मंत्रालयात ‘महसूल सहाय्यक’ या पदावर निवड झाली आहे. या घवघवीत यशामुळे अभ्यासिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मंत्रालयात महसूल सहाय्यक पदाला गवसणी घालणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक प्रदीप मेश्राम (रा. पिंपळगाव/सडक, ता. लाखनी) आणि राहुल प्रकाश बोकडे (रा. कारधा, जि. भंडारा) या दोन युवकांचा समावेश आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सामाजिक न्याय विभागाच्या अभ्यासिकेतील मार्गदर्शन आणि स्वतःच्या कष्टाच्या जोरावर या दोघांनी हे यश संपादन केले आहे.

या दोन्ही नवनियुक्त महसूल सहाय्यकांचा भंडारा समाज कल्याण कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे आणि विशेष अधिकारी (शानिशा) विठ्ठलसिंग बलावणे यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. “या विद्यार्थ्यांचे यश हे इतर ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळण्यासाठी आणि कठोर परिश्रम करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना व्यक्त करत उपस्थित अधिकाऱ्यांनी दोन्ही युवकांना त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button