
नगर परिषदेत महत्वपूर्ण बैठक ; शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा
गडचिरोली : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी ‘रिंग रोड’ हाच एकमेव पर्याय असून, हा प्रकल्प तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करा, अशी आग्रही मागणी गडचिरोलीच्या नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्याशी सविस्तर चर्चा करून शहराच्या व्यथा मांडल्या.
नगर परिषद गडचिरोली येथे आयोजित एका विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील भीषण वाहतूक समस्येवर भाष्य करताना नगराध्यक्षा निंबोरकर म्हणाल्या, “माझ्यासाठी पदापेक्षा गडचिरोलीतील नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. जर अरुंद रस्त्यांमुळे आणि अवजड वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचे प्राण जात असतील, तर ते थांबवणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. रिंग रोड हा केवळ प्रकल्प नसून तो गडचिरोलीच्या सुरक्षिततेचा मार्ग आहे.”
बैठकीत नगराध्यक्षांनी रिंग रोडची गरज अधोरेखित करण्यासाठी मुद्दे मांडले: वाढती लोकसंख्या व वाहने: गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार झाला असून वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अवजड वाहतूक: शहराच्या मुख्य भागातून होणारी जड वाहनांची ये-जा अपघातांना निमंत्रण देत आहे. अरुंद रस्ते: सध्याचे रस्ते वाढत्या वाहतुकीचा ताण पेलण्यास असमर्थ ठरत आहेत. नियोजित विकास: रिंग रोडमुळे शहराबाहेरून वाहतूक वळवता येईल, ज्यामुळे अंतर्गत रस्ते मोकळे होतील आणि विकासाला गती मिळेल.
या बैठकीत केवळ रिंग रोडच नव्हे, तर शहराच्या सर्वांगीण विकासावरही चर्चा झाली. शहरातील पायाभूत सुविधा, अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणाबाबत सहपालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, विविध समितींचे सभापती, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या या दूरदृष्टीपूर्ण भूमिकेमुळे गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, रिंग रोडचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास शहरवासीयांकडून व्यक्त केला जात आहे.



