
तुमसर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने धारदार तलवारीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. त्यात तिच्या कानाला गंभीर जखम झाली. सुदैवाने ती या प्राणघातक हल्ल्यातून बचावली. ही घटना शुक्रवारी दुपारी १:३० च्या सुमारास तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे घडली. या घटनेने नवरगाव येथे एकच खळबळ माजली आहे. सुनीता सुनील गुरवे (४५) असे जखमी पत्नीचे आहे. हे दाम्पत्य नवरगाव येथे राहते.
शुक्रवारी सुनीता गुर्वे ही जेवण करून विवाहित मुलगी पूजा नितेश धुंडे (२६, रामाकोना, ता. सौंसर, मध्य प्रदेश) हिच्यासोबत दुपारी घरीच झोपली होती. दरम्यान, पती सुनील गुरवे (५०) यांच्यात पती व पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. सुनील पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. यातूनच हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात सुनील धारदार तलवार घेऊन पत्नी सुनीताच्या अंगावर धावून गेला. तिच्यावर तलवारीने वार केला. सुदैवाने तलवार सुनीताच्या कानाला लागली. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. सुनीताच्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आले. जखमी पत्नीला उपजिल्हा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलगी पूजा धुंडे हिच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), सहकलम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सयाम करीत आहेत.
या घटनेनंतर सुनील स्वतःच तुमसर पोलिस ठाण्यात पोहोचला आणि अटक करण्यापूर्वीच शरणागती पत्करली. तो दिल्ली येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. नवरगाव येथे त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी व आई राहतात. नवरगाव येथे सुनील आल्यानंतर पत्नीशी त्याचे नेहमीच वादविवाद व्हायचे. शुक्रवारी या दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण होऊन ही दुर्दैवी घटना घडली.



