गोंदियाविदर्भ

अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात आढळला बिबट्याचा मृतदेह

वाघाच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

गोंदिया : गोंदिया वन विभागातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत बोंडगाव नियतक्षेत्रातील बोदरा येथील मौजा सोनेगाव झुडपी जंगल कक्ष क्र. १३८८ मध्ये २२ मे २०२५ रोजी गस्त घालत असताना क्षेत्र सहायक आर.एस. भोगे यांना एक मृत बिबट आढळून आला.

ही माहिती मिळताच वनअधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी अर्जुनी/मोर, डॉ. उज्ज्वल बावनथडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याच्या मानेवर आणि दोन्ही पायांवर इतर वन्यप्राण्याच्या नखांच्या आणि दातांच्या जखमांची निशाणी आढळून आली. तसेच, घटनास्थळी वाघाचा अधिवास असल्याचेही दिसून आले. यावरून, बिबट्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगावबांध अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी नवेगावबांध डॉ. घनश्याम ठोंबरे, नायब तहसीलदार अर्जुनी/मोर एम.के. क्षिरसागर, सहाय्यक आयुक्त पं.स. अर्जुनी/मोर डॉ. वामन डपेटवार, पशुधन विकास अधिकारी अर्जुनी/मोर डॉ. उज्ज्वल बावनथडे तसेच मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे आणि रुपेश निंबार्ते यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याच्या शवाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, मृत बिबटाचा मृतदेह अर्जुनी/मोर आगार येथे हलवून पशुधन विकास अधिकारी अर्जुनी/मोर यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्याच्या अवयवांचे नमुने सीलबंद करून वनअधिकारी आणि क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबटाचे शव जाळून नष्ट करण्यात आले.

या बिबट वन्यप्राण्याच्या मृत्यू प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, उपवनसंरक्षक, गोंदिया वनविभाग, गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगावबांध हे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button