गोंदियाविदर्भ

सेवानिवृत्त कर्मचारी समाजाचे आधारस्तंभ – माजी आ. कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन

देसाईगंजमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्थेची वार्षिक सभा

देसाईगंज : सेवानिवृत्त कर्मचारी हे समाजाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांची सेवा आणि अनुभव समाजासाठी अमूल्य आहे, असे प्रतिपादन माजी आ. कृष्णा गजबे यांनी केले.

सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्था, देसाईगंज, गडचिरोलीची वार्षिक आमसभा १२ सप्टेंबर रोजी श्री गजानन बाबा मंदिर येथे उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या सभेला भारतीय स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक सुनीलकुमार गजभिये, संस्थेचे अध्यक्ष आर. एस. सोयाम, सचिव बी. डी. सांगोळे, कर्मचारी पेन्शन संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. ज्यांनी विविध विषयांवर विचारमंथन करून समाजहिताचे निर्णय घेतले.

पुढे माजी आ. गजबे म्हणाले, संस्था जे कार्य करत आहे ते समाजाच्या हिताचे असून, सभासदांचे सामाजिक आणि आर्थिक कल्याण साधण्याचे उद्दिष्ट प्रेरणादायी आहे. नव्या पिढीने वरिष्ठांचा अनुभव घेऊन एकजुटीने समाजविकासासाठी योगदान द्यावे. संस्थेचे कार्य केवळ आर्थिक मदतपुरते मर्यादित न ठेवता समाज, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातही वाढवावे.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. संस्थेचे अध्यक्ष आर. एस. सोयाम यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर सचिव बी. डी. सांगोळे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये संस्थेच्या कामाचा आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. संस्था सचिवांनी सांगितले की, सेवा निवृत्त कर्मचारी कल्याण संस्था, देसाईगंज समाजाच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबविणार आहे आणि सर्व सभासदांसाठी हे प्रेरणादायी ठरेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. डी. सांगोळे यांनी केले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button