
धानोरा : तालुक्यातील ग्रामपंचायत मुरुमगाव येथील महसूल मंडळ संकूल इमारतीच्या छताला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती लागल्यामुळे सर्व खोल्यांमध्ये पाणीच पाणीच दिसून येत आहे. सदर समस्येमुळे या कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
ऐन पावसाळयात सदर इमारतीला पाणी गळती लागल्यामुळे कर्मचाऱ्यांसह विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. मुरुमगाव येथील महसूल मंडळ संकूल कार्यालयातील शासकीय दस्तावेज खराब होण्याची शक्यता वाएली आहे. कारण की पूर्ण कार्यालय जलमय झाल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी मुरुमगाव येथील महसूल मंडळ संकूल कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. सध्या परिस्थितीत सदर इमारत जलमय झाली आहे. संततधार पावसाचा जोर कायम असून पाणी गळत नाही, अशी एकही खोली या कार्यालयात सध्यातरी दिसून येत नाही. तसेच जेव्हापासून राजस्व विभागाची ही इमारत महसूल मंडळ संकूल कार्यालय इमारत बांधण्यात आली आहे तेव्हापासून या इमारतीत विद्युत प्रवाह खंडित आहे. इमारतीत लाईट, पंखे लावलेली आहेत पण बंद स्थितीत दिसून येतात. या इमारतीत केरकचरा पण आढळून येत आहे. तसेच महसूल मंडळ संकूल कार्यालय मुरुमगाव येथील मडल अधिकारी समेत संपूर्ण तलाठी वर्ग मुख्यालयामध्ये उपस्थित राहत नाही. सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.



