
गोंदिया : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ‘नेत्रदान पंधरवाडा’ साजरा केला जात आहे. या निमित्ताने, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून नेत्रदानाविषयी जनजागृती केली जात आहे. नेत्रदान हे ‘महादान’ असून, यामुळे अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय होऊ शकते, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी केले आहे.
नेत्रदान पंधरवड्याचा मुख्य उद्देश नागरिकांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासंबंधी असलेले गैरसमज दूर करणे हा आहे, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी सांगितले. अनेकदा सामाजिक किंवा धार्मिक गैरसमजांमुळे नागरिक नेत्रदान करण्यास कचरतात. ही भीती दूर करून, नेत्रदानाला एक सामाजिक चळवळ बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून, जिल्हा आरोग्य प्रशासन, के.टी.एस. सामान्य रुग्णालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑगस्ट रोजी शहरात एक भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. ही रॅली के.टी.एस. रुग्णालयापासून सुरू होऊन शहरातील विविध भागांतून गेली. यामध्ये विविध संदेश असलेले फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती निर्माण करण्यात आली.
यावेळी डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकिशोर पारधी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल, डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, डॉ. घोरमारे, नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले, नेत्र विभागातील वैद्यकिय अधिकारी डॉ. सागर, डॉ. श्रुती गायधनी, डॉ. पोयाम, डॉ. अनिल आटे, डॉ. निलेश जैन उपस्थित होते. प्रभातफेरीच्या शेवटी सर्वांनी नेत्रदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे नेत्रदानाबद्दल जागरूकता वाढेल आणि अधिक लोक पुढे येतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.



