
मुखडी येथे अवैध दारूविक्रीवर कारवाई
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील मुखडी गावात अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग आणि ‘मुक्तीपथ’च्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत जंगलातून 55 हजार 200 रुपयांचा 10 ड्रम मोह सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला असून दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी मुक्तीपथच्या वतीने महिलांच्या ‘शक्तीपथ’ व ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये महिलांनी दारूविक्री बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले होते. यासोबतच मुलचेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी सुद्धा गावात अवैध दारूविक्री बंदीसाठी बैठक घेतली होती. त्यानंतर काही दिवस गावातील दारूविक्री बंद झाली होती, परंतु काही विक्रेत्यांनी पुन्हा ही विक्री सुरू केली. याची दखल घेत मुक्तीपथ आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या जंगल परिसरात अहिंसक कृती केली. जंगल परिसरातून १० ड्रम मोह सडवा जप्त करण्यात आला. याप्रकरणी अवैध विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाचे राजेश पुल्लूरी, सचिन मंथनवार, कल्याणी नवघरे, प्रीती घुणे, प्रियंका कुळमेथे, पोलीस पाटील किशोर मडावी, प्रतिष्ठित नागरिक नरेश तलांडे, मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे आणि तालुका प्रेरक पल्लवी तुपसुंदर सहभागी झाले होते.



