गडचिरोलीविदर्भ

१०० युवतींनी घेतला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ

दादालोरा खिडकी उपक्रमातून ४५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण संपन्न ; आतापर्यंत २०५ उमेदवारांची शासनात निवड

गडचिरोली : जिल्ह्यातील सुशिक्षित युवक-युवतींना शासकीय नोकरी मिळवून आत्मनिर्भर करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत आयोजित निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे १३ वे सत्र यशस्वीरित्या पूर्ण झाले. ११ नोव्हेंबरला एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय येथे १०० प्रशिक्षणार्थी युवतींचा निरोप समारंभ पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत पार पडला.

२७ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर पर्यंत, असे एकूण ४५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या १३ व्या सत्रामध्ये १०० युवतींनी आपला सहभाग नोंदविला. उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, सायबर जनजागृती, महिला गुन्हे माहिती आणि नवीन कायद्यांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना लोअर, टी-शर्ट, शूज, अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोफत वितरीत करण्यात आले.

प्रशिक्षणाअखेरीस घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या युवतींचा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पोलीस दलाच्या या अभिनव उपक्रमातून आतापर्यंत जिल्ह्याला मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील एकूण २५४३ युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे. यापैकी एकूण २०५ युवक-युवतींची शासनाच्या विविध विभागांमध्ये निवड झालेली आहे. यासोबतच, ‘एक गाव एक वाचनालय’ या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ७३ ठिकाणी सुसज्ज वाचनालयांची निर्मिती करण्यात आली आहे. सन २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ११,६९,७३५ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “या प्रशिक्षणाचा सर्वांना आगामी पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षामध्ये नक्कीच लाभ होणार आहे. स्वतःचे आरोग्य आणि अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करत सर्वांनी चांगले यश प्राप्त करावे.”

यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनीही प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टेचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button