शिंदेसेनेच्या पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुख नियुक्त्यांना स्थगिती

समन्वयाचा अभाव असल्याच्या तक्रारीनंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी घेतली बैठक
मुंबई : शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये पूर्व विदर्भात नुकत्याच झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्यांना अखेर स्थगिती देण्यात आली आहे. आता संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री दीपक सावंत हे या संदर्भात सर्व संबंधित नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.
या नियुक्त्यांमध्ये आपल्याला विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर अन्य नेत्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (१७ जून) मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीला दीपक सावंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि किरण पांडव उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित सर्व नेत्यांना एकमेकांशी समन्वय साधून नवीन नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्यास सांगितले. “आधीपासून पक्षात असलेल्यांना डावलून काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्यांना संधी देणे योग्य होणार नाही. त्यांना (नवीन कार्यकर्त्यांना) काही दिवस काम करू दिले पाहिजे,” असा सूर या बैठकीत होता. या स्थगितीमुळे आता पूर्व विदर्भातील संघटनात्मक बांधणीसाठी नव्याने विचारमंथन केले जाईल, अशी शक्यता आहे.



