
आ. धर्मरावबाबा आत्राम यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
भामरागड : अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागडमध्ये आरोग्य सुविधांचा मोठा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या तालुका मुख्यालयात असलेल्या केवळ ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयात १२८ गावांचा समावेश असलेल्या या तालुक्यातील रुग्णांना उपचार घेणे कठीण झाले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याची मागणी माजी मंत्री तथा अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे केली आहे.
१९९२ मध्ये एटापल्ली तालुक्याचे विभाजन करून भामरागड तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने तालुका मुख्यालयात ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले. यासोबतच, खेड्यापाड्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, २० उपकेंद्रे आणि २ आरोग्य पथके कार्यरत आहेत. मात्र, या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार करून गंभीर आजार असल्यास रुग्णांना तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते. तालुका मुख्यालयातील रुग्णांनाही उपचारासाठी याच ठिकाणी जावे लागते. याव्यतिरिक्त, लगतच्या छत्तीसगड राज्यातील अनेक रुग्णही भामरागड तालुक्यात उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत, केवळ ३० बेडमुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, त्यांना उपचारासाठी बाहेर जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
भामरागड तालुक्यात आजघडीला लोकसंख्या वाढली आहे, मात्र ग्रामीण रुग्णालयाची स्थिती सुरुवातीपासून तशीच आहे. विशेषतः, पावसाळ्यात दरवर्षी या तालुक्यात रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे येथील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्र्यांकडे भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढवून त्याला १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.



