मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; ८ गुन्हे उघड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलिसांची कारवाई ; चंद्रपूर जिल्ह्यातील वाहन चोरीचा गुन्हाही उघडकीस
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या वाढत्या घटनांवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गडचिरोलीतील ८ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील वाहन चोरीचा १, असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पोलिसांनी चोरलेले पिकअप वाहन आणि रोख रकमेसह एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. मागील १५ दिवस पथकाने संवेदनशील भागांमध्ये गुप्त पाळत ठेवली. यावेळी एका पिकअप वाहनावर संशय निर्माण झाला. सदर वाहनाचे चालक गोविंद खंडेलवार (१९, आलापल्ली) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हे वाहनही चोरीचे असल्याची कबुली दिली.
खंडेलवारने उमेश मनोहर इंगोले (३८, नेहरु नगर, गडचिरोली) व आणखी दोन साथीदारांच्या मदतीने कांदोली, गुरज्या, येमली, ताडगाव, तलवाडा, वेदमपल्ली आणि राजाराम (खां.) येथील मोबाईल टॉवरवरून बॅटऱ्या चोरल्याचे उघड झाले. चोरी केलेल्या बॅटऱ्या त्यांनी तिरुपती व्यंकया दासरी (३८, अहेरी) यास विकल्या, ज्या दासरीने पुढे कागजनगर येथील याकुब शेख यास विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून २ लाख रुपये रोख रक्कम, ३ लाख रुपये किमतीचे चोरीचे पिकअप वाहन, तसेच इतर साहित्य मिळून एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे पोमके अहेरी (२), पेरमिली (२), येमली बुर्गी (२), ताडगाव (१) व राजाराम (खां.) (१) येथील मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे ८ गुन्हे आणि गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) येथील वाहन चोरीचा १ गुन्हा उघडकीस आला आहे.
सध्या आरोपी येमली बुर्गी येथील गुन्ह्यात अटकेत असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे दुर्गम भागातील टॉवर सुरक्षा बळकट झाली असून, पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. भगतसिंग दुलत, पोउपनि, विकास चव्हाण, मपोउपनि. इंगोले तसेच पोलीस कर्मचारी सतिश कत्तीवार, राजु पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे, श्रीकांत बोर्डना, धनंजय चौधरी, दिपक लोणारे, गणेश वाकडोतपवार व सुजाता ठोंबरे यांनी सहभाग नोंदविला.



