
गंगाझरी-तिरोडा मार्गावर अपघात; दोन्ही कार चालकांवर गुन्हा दाखल
गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गंगाझरी-तिरोडा मार्गावर शुक्रवार, २६ जून रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास दोन भरधाव कारची अमोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन्ही कारमधील अन्य नऊ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. हर्ष विजय दलवानी (वय २५, रा. रेव्हेन्यू कॉलनी, गणेशनगर, गोंदिया) असे अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमित हरीश गुरनानी (वय २६, रा. सेलटॅक्स कॉलनी, गोंदिया) हा आपल्या कारने (क्रमांक एमएच १३-डीएम ५५५०) मित्रांसह गोंदियाहून तिरोडाच्या दिशेने जात होता. याच वेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच तिरोडाहून गोंदियाकडे कपिल राजेंद्र रहांगडाले (वय २२, रा. ननसरी) हा आपल्या कारने (क्रमांक एमएच ३५-बीसी १७५४) मित्रांना घेऊन येत होता. गंगाझरी गावाजवळ दोन्ही चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेल्या दोन्ही कार एकमेकांवर जोरात आदळल्या. या धडकेत अमितच्या कारमधील हर्ष दलवानी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर लगेचच ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती मिळताच गंगाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दुर्योधन मारबते व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले व तातडीने उपचारासाठी गोंदियाच्या केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविले. कार चालक अमित गुरनानी आणि कपिल रहांगडाले या दोघांनीही आपली वाहने अतिवेगात व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात दोन्ही वाहनांमधील ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत: कार क्र. एमएच १३-डीएम ५५५० मधील जखमी: चालक अमित गुरनानी (२६), केतन पिंकी असाटी (२१, रा. लालागल्ली, गोंदिया), नवीन अशोक राजगुरू (२८, रा. वाजपेयी चौक, गोंदिया) आणि आदित्य साहेल सुंदरानी (२४, रा. सेलटॅक्स कॉलनी, गोंदिया). कार क्र. एमएच ३५-बीसी १७५४ मधील जखमी: चालक कपिल राजेंद्र रहांगडाले (२२, रा. ननसरी), यश दशरथ रहांगडाले (२२, रा. धुंदाटोला), शुभम व्यंकट रहांगडाले (२२, रा. अंजोरा-आमगाव), उदय भास्कर रहांगडाले (२३, रा. तांडा) व मयूर धारासिंग चव्हाण (२२, रा. अंगुरबगीचा, गोंदिया).
या भीषण अपघातामुळे गोंदिया आणि तिरोडा परिसरातील तरुण वर्गावर आणि नातेवाईकांवर मोठी शोककळा पसरली आहे.



