
कोळसेपली येथील घटना ; आरोपी वडिलाला अटक
अहेरी : तालुक्यातील कोळसेपली गावात किरकोळ वादातून एका पित्यानेच आपल्या मुलाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण बंडे वेलादी (वय ३८) असे मृताचे नाव असून, आरोपी वडिलांचे नाव बंडे बीरा वेलादी (वय ६५) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलगा यांच्यात एका किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपी वडिलांनी कुऱ्हाडीने मुलाच्या डोक्यावर वार केला. गावकऱ्यांनी गंभीर अवस्थेत लक्ष्मणला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृताचा लहान भाऊ संतोष बंडे वेलादी (वय २७) याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रक्तमिश्रित माती, खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड आणि काठी असा मुद्देमाल जप्त केला आहे. दामरंचा उपपोस्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज बाराते करीत आहेत.



