
गडचिरोली : जिल्ह्यातील चुरचुरा जंगलात रानटी हत्तीच्या हल्ल्यात गुराखी वामन मारोती गेडाम (६२) यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाचे (आप) जिल्हा सचिव अमृत मेहेर यांनी वन विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली आहे. वामन गेडाम यांचा मृत्यू ही केवळ एक दुर्दैवी घटना नसून, वन विभागाच्या पूर्ण निष्काळजीपणाचा थेट परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मेहेर यांनी आरोप केला की, “स्थानिकांना हत्तींच्या हालचालींची माहिती असतानाही, वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना, पेट्रोलिंग किंवा हत्तींना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. यामुळेच वामन गेडाम यांचा बळी गेला.” ते म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत हत्तींमुळे ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. शासन आणि वन विभाग केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. छत्तीसगडमधून आलेल्या या हत्तींना रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेवर कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही. वन विभागाचे अधिकारी केवळ कार्यालयात बसून आहेत, पण प्रत्यक्ष कारवाई शून्य आहे.” मेहेर यांनी हा प्रशासकीय निष्क्रियतेचा परिणाम असून, आम आदमीच्या जीवावर बेतलेला प्रकार असल्याचे म्हटले.
मेहेर यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचारी नसल्यामुळे गेडाम कुटुंबीयांना रात्रभर त्रास सहन करावा लागल्याबद्दलही संताप व्यक्त केला. “मृत्यूनंतरही प्रशासनाची असंवेदनशीलता दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा उपलब्ध नाहीत का? हे सर्व काही या जिल्ह्यातील गरीब आणि आदिवासींबद्दलची प्रशासनाची उदासीनता दाखवते,” असे ते म्हणाले.
अमृत मेहेर यांनी सरकारवर हल्लाबोल करताना, “भाजप शासनाच्या काळात हत्तींची दहशत वाढतच आहे. आम आदमी पक्ष हे सहन करणार नाही,” असे म्हटले. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि वनसंरक्षक यांच्याशी भेट घेऊन हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच, वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, हत्तींवर तात्काळ कारवाई आणि वन विभागाच्या जबाबदाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आम आदमी पक्षाने या घटनेवर सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र येऊन हत्ती समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.



