प्राचीन हस्तलिखिते जतन करण्यासाठी जिल्ह्यात ‘ज्ञानभारतम्’ मोहीम सुरू

निवासी उपजिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून समन्वय साधतील
गोंदिया : देशभरातील प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखिते सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञानभारतम्’ ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत जुनी पोथी, पांडुलिपी, ताम्रपट किंवा अन्य दस्तऐवज शोधून त्यांचे डिजिटायझेशन करून जतन केले जाईल.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार नागरिकांनी, संस्थांनी आणि विशेषतः मंदिरे, मठ तसेच विविध धर्मीय पुरोहितांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. ही पावले आपल्या पूर्वजांचा अमूल्य वारसा पुढील पिढीसाठी सुरक्षित ठेवण्याची सुवर्णसंधी आहेत.
या मोहिमेअंतर्गत होणार डिजिटायझेशन: हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल स्वरूपात जतन केली जातील. मालकी हक्क सुरक्षित राहतील, मूळ हस्तलिखित परत मिळेल, फक्त त्याची डिजिटल प्रत शासन जतन करेल. पुरोहित आणि अभ्यासकांना संधी मिळेल, आपल्या हस्तलिखितांचे जागतिक स्तरावर जतन करण्याची संधी. ज्या नागरिकांकडे किंवा संस्थांकडे अशा प्राचीन दस्तऐवज आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा ग्राम महसूल अधिकारी कार्यालय येथे माहिती द्यावी. यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत.
नोडल अधिकारी: श्री भैय्यासाहेब बेहेरे, निवासी उपजिल्हाधिकारी, गोंदिया, फोन: ८१०८१५१५९६, ईमेल: b.behere७०@mah.gov.in
जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या पूर्वजांचा हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी पुढाकार घ्या.



