भंडाराविदर्भ

शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तेलबिया पिकाकडे वळावे

भंडारा येथे जवस व मोहरी पिकाचे क्षेत्र विस्तार आणि बिजोत्पादन प्रशिक्षण कार्यशाळा

भंडारा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) आणि महाबीज, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गळीत धान्य पिकाच्या जवस (Flaxseed) व मोहरी (Mustard) पिकाचे क्षेत्र विस्तार आणि बिजोत्पादन प्रशिक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. २८ नोव्हेंबर रोजी इंद्रलोक सभागृह येथे झालेल्या या कार्यशाळेत रब्बी हंगामात कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याचे तंत्र शेतकऱ्यांना शिकवण्यात आले.

या कार्यशाळेला आत्मा अंतर्गत बीज उत्पादनाचे कार्यक्रम आयोजित केलेल्या शेतकरी गट आणि वैयक्तिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प संचालक उर्मिला चिखले यांनी अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांनी भात पिकानंतर रब्बी हंगामामध्ये तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला. त्यांनी मोहरी आणि जवस पिकाचे महत्व, कमी खर्चातील उत्पादन आणि चांगले उत्पन्न यांची सांगड घालून शेतकऱ्यांनी या पिकांकडे वळावे, असे प्रतिपादन केले.

शरद भुरे (तंत्र सहाय्यक, कृषी विद्यापीठ, नागपूर) यांनी मोहरी पीक लागवड तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन आणि त्यापासून मिळणारे अपेक्षित उत्पन्न यावर मार्गदर्शन केले. स्नेहल वैद्य (तंत्र सहाय्यक, कृषी विद्यापीठ, नागपूर) यांनी जवस लागवड तंत्रज्ञान, दैनंदिन आहारातील जवसाचे आरोग्यदायी महत्त्व आणि विक्री व्यवस्थापन यावर सादरीकरण केले. कृषी विज्ञान केंद्र, साकोलीचे किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर यांनी मोहरी-जवस पिकावर येणारे कीड-रोग एकात्मिक व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महाबीज, भंडाराचे जिल्हा व्यवस्थापक पिंजरकर यांनी जवस-मोहरी उत्पादन संकल्पना आणि शेतकऱ्यांना होणारे आर्थिक फायदे स्पष्ट केले.

प्रकल्प उपसंचालक अजय कुमार राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर एस. डी. वैरागडे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button