गोंदियाविदर्भ

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन

मूकबधिर शाळेतील १८ कर्मचारी व ५४ विद्यार्थ्यांची तपासणी ; विविध आजारांवर मार्गदर्शन

गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NCDCP) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आयोजित करून असंसर्गजन्य रोगांविषयी (NCDs) जनजागृती केली जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून, २५ जुलै रोजी उदयन बहुउद्देशीय विकास संस्था संचालित मंगलम मूकबधिर निवासी शाळा, गोंदिया येथे एक विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हर आणि एनसीडी कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली, केटीएस रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात शाळेतील १८ कर्मचारी आणि ५४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांची रक्तदाब (BP) आणि मधुमेहासाठी (Sugar) तपासणी झाली, तर विद्यार्थ्यांची सिकल सेल आजारासाठी तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनम जाधव यांनी नियमित रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, भौतिकोपचार तज्ञ डॉ. कांचन भोयर यांनी कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम आणि योग्य आहाराचे फायदे सविस्तरपणे समजावून दिले.

शिबिरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या संध्या शंभरकर यांनी कोटपा कायदा २००३ (COTPA Act 2003) अंतर्गत येणाऱ्या कलमांची माहिती देऊन जनजागृती केली. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाच्या समुपदेशिका निशा डहाके यांनी मुलांना आणि मुलींना सिकलसेल आजाराविषयी माहिती दिली. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन आणि तपासणीचे महत्त्व त्यांनी विषद केले.

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशिका सपना ठाकरे यांनी लहान मुलांना ‘गुड टच बॅड टच’ (Good Touch Bad Touch) याविषयी माहिती दिली. किशोरवयीन मुला-मुलींना वाढत्या वयात येणारे मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदल तसेच त्याचे परिणाम यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. ‘मैत्री क्लिनिक’मध्ये (Maitri Clinic) उपलब्ध असलेल्या सुविधांची माहितीही त्यांनी दिली.

या यशस्वी आयोजनासाठी केटीएस रुग्णालयाचे ब्रदर मनोज राठोड, निकिता शरणागत, मंगलम मूकबधिर निवासी शाळेचे प्राचार्य रेशु चोकसे, विशेष शिक्षक डिंपल ठाकरे व शरद उईके, तसेच वसतिगृह अधीक्षक योगेश्वर मरगडे यांचे सहकार्य लाभले. उदयन बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष अजय पालीवाल आणि उपाध्यक्ष दिलीप जैन यांनी यापुढेही अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करून असंसर्गजन्य रोगांसाठी जनजागरण करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button