मोहटोळी वेचायला गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार

देलोडा जंगलातील घटना; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, चालू वर्षातील दुसरा व्याघ्रबळी
गडचिरोली : मोहटोळी वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना पोर्ला वनपरिक्षेत्रातील देलोडा (ता. आरमोरी) जंगलात ५ जून रोजी सकाळी दहा वाजता घडली. मीरा आत्माराम कोवे (वय ५५, रा. सुवर्णनगर, देलोडा) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरा कोवे सकाळी दहा वाजताच्या सुमारास जेवण करून गावाला लागून असलेल्या जंगलातील कक्ष क्रमांक १० मध्ये मोहटोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या. मोहटोळी वेचण्यात त्या मग्न असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.
पोर्ला ते वडधा मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्याचे समजले. मात्र बराच वेळ उलटूनही मीरा कोवे घरी परत न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. दुपारी चार वाजताच्या सुमारास जंगल परिसरात शोधाशोध सुरू केली असता, मीरा कोवे यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने तात्काळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर: मीरा कोवे यांच्या नशिबी दुःखाची मालिकाच होती. त्यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर चार वर्षांपूर्वी मोठ्या मुलाचा आजारपणात मृत्यू झाला, तर दोन वर्षांपूर्वी धाकट्या अविवाहित मुलानेही आजारपणात प्राण सोडले. मीरा कोवे या आपल्या सून आणि दोन लहान नाती यांच्यासह राहत होत्या. जेमतेम दीड एकर शेतीवर त्यांची गुजराण होती. त्यामुळे पती आणि दोन्ही मुलांच्या जाण्याचे दुःख पचवत त्या मोलमजुरी आणि हंगामात मोहफुले, मोहटोळी वेचणी करून कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चालू वर्षातील ही दुसरी व्याघ्रबळीची घटना आहे. यापूर्वी चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रे.) येथे मार्च २०२५ मध्ये वाघाने एका पुरुषाचा बळी घेतला होता. देलोडा जंगलात मीरा कोवे यांनाही वाघाच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



