
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना भेटवस्तू देऊन सत्कार
कोरची : मराठी पत्रकार दिनानिमित्त कोरची पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी सोमवारी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कोरची शहरात मागील १७ वर्षापासून बस स्थानकावर प्रवाशांना सेवा देणाऱ्या रामसाय (टोपी) साहाळा रा. नवरगाव आणि तालुक्यात अनेक वर्षांपासून वार्तांकन करणाऱ्या जेष्ठ पत्रकार बांधवांना पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
कोरची पोलीस स्टेशन येथील सभागृहात सोमवार, ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सत्कारमूर्ती हमाल रामसाय (टोपी) साहाळा, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे उपस्थित होते.
कोरची नजीकच्या नवरगाव येथून दररोज दोन किमी पायदळ चालत शहरात येऊन बस स्थानकावर बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सामानांचा ओझं डोक्यावर घेऊन एसटीच्या वर चढवणे व खाली उतरविण्याचे काम मागील १७ वर्षापासून रामसाय (टोपी) हे करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अनेकदा दिव्यांग, अपंग आणि वयोवृद्ध प्रवाशांकडून पैशाची अपेक्षा ठेऊन काम केलं. नाही त्यांचं मोफत सामान चढवून व उतरवून घरापर्यंत सोडून देण्याचे काम त्यांनी केलं आहे. मात्र स्वताच्या प्रसिद्धीची आवड मनात कधी ठेवली नाही. त्यामुळे पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील पोलीस निरीक्षकांनी त्यांचा भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
तसेच कोरची तालुक्यात अनेक वर्षांपासून विविध वृत्तपत्रात, पोर्टलवर वार्तांकन करणारे जेष्ठ वार्ताहर व पत्रकारांनी समाजाला जागृत करण्याचं काम तसंच त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कुठलीही भीती न बाळगता, कुणाच्याही दबावाखाली न येता काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना डायरी व पेन भेटवस्तू देऊन पहिल्यांदाच पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सत्कार केला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर नखाते, नंदकिशोर वैरागडे, लालचंद जनबंधू, शालीकराम कराडे, राष्ट्रपाल नखाते, अरुण नायक, सुरज हेमके, राहुल अंबादे, आशिष अग्रवाल, जितेंद्र सहारे, वसीम शेख, श्याम कुमार यादव, प्रशांत कराडे आदींसह पोलीस अधिकारी शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदेसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



