गडचिरोलीविदर्भ

गाव व्यसनमुक्त करण्यासाठी आशा स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा

मुक्तीपथ अभियानांतर्गत २० गावांतील स्वयंसेविकांचे प्रबोधन ; मुलांना कॅन्सरच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी महिलांनी संघटित होण्याचे आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यातील दारू आणि तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘मुक्तीपथ’ अभियानांतर्गत विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतीच आशा कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत परिसरातील २० गावांमधील आशा स्वयंसेविका यांना गाव व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मुक्तीपथच्या टीमने तंबाखूच्या घातक परिणामांवर प्रकाश टाकला. गावागावांत तंबाखूविरोधी वातावरण निर्मिती करून घरातील लहान मुलांना भविष्यात होणाऱ्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कुटुंबाचे आरोग्य राखण्यात महिलांची आणि विशेषतः आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत मुक्तीपथ टीमने व्यक्त केले. गावपातळीवर आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांनी व्यसनमुक्तीच्या कार्यात आपला हातभार लावावा. केवळ आरोग्य सेवाच नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी देखील त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

मुक्तीपथतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या मुक्तीपथ मॅरेथॉन, शक्तिपथ बैठका, तंबाखूविरोधी जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन जागृती करावी. ग्रामस्थांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि गावातील दारू-तंबाखूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी नेतृत्व करावे. महिलांनी संघटित होऊन शक्तिपथ बैठकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा लढा अधिक तीव्र करावा, जेणेकरून एक सुदृढ आणि व्यसनमुक्त समाज घडवता येईल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यशाळेला डॉ. नमन, आशा सुपरवायझर पार्वती दुर्गे, मुक्तीपथचे महेश खोब्रागडे, धीरज शामकुवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button