महाराष्ट्रमुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून राज्यातील १५ पत्रकारांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ प्रदान

सकारात्मक पत्रकारितेचा जागर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून वेगळे पाऊल 

मुंबई : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या राज्यातील १५ ध्येयवादी पत्रकारांचा मुंबईत ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ देऊन गौरव करण्यात आला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि राज्य शासनाच्या ‘आयुष्यमान भारत समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक परिणामकारक बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये विविध विभागांतून पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना कुणाल लाडे (डहाणू) यांनी, “ग्रामीण भागातील समस्यांना सकारात्मक न्याय दिल्याची ही पावती असून, यामुळे दुर्गम भागातील पत्रकारितेला नवी उभारी मिळेल,” अशी भावना व्यक्त केली. तर संदेश साळुंके (रायगड) यांनी, “लोकहिताच्या बातम्या समाजापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय होते आणि या गौरवामुळे समाजकार्याची ओढ अधिक वाढली आहे,” असे सांगितले.

विदर्भातून शाहिद पठाण (गोंदिया) म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या संघर्षाचा सन्मान असून सकारात्मक बदलांचे वार्तांकन करण्याची प्रेरणा यातून मिळाली आहे.” तर रुपेश बाजड (वाशिम) यांनी, “नकारात्मकतेच्या प्रवाहात चांगल्या बातम्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा क्षण आहे,” असे नमूद केले. पश्चिम महाराष्ट्रातील राहुल पवार (कराड) यांनी, “या पुरस्काराने माझ्या लेखणीला नवी ताकद आणि जबाबदारी दिली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तर स्वप्निल कांबळे (राधानगरी) यांनी, “कृषी आणि सामाजिक विषयांना मिळालेली ही मोठी पावती आहे,” असे सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातून ईश्वर महाजन (अमळनेर) यांनी, “केवळ प्रश्न मांडणे नव्हे, तर त्यावर तोडगा सुचवणे हीच खरी पत्रकारिता आहे,” असे मत मांडले. तर महेंद्रसिंग गिरासे (शिंदखेडा) यांनी, “सकारात्मक वार्तांकनातून समाजक्रांती घडवता येते, यावर माझा विश्वास आहे,” असे सांगितले. मराठवाडा विभागातून भारत सवणे (परतूर) यांनी, “हा सन्मान माझ्या भागातील प्रत्येक कष्टकरी माणसाचा आहे,” असे नमूद केले. तर विनोद कांबळे (लातूर) यांनी, “हा पुरस्कार माझ्या पुढील प्रवासासाठी दीपस्तंभ ठरेल,” अशी भावना व्यक्त केली.

विशेष विंग अंतर्गत लियाकत पठाण (नाशिक – उर्दू विंग) यांनी उर्दू पत्रकारितेला मुख्य प्रवाहात स्थान दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर सारिका शिंदे (ठाणे – महिला विंग) यांनी, “महिला पत्रकारांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे,” असे सांगितले. संदीप पिंपळकर (वाशिम – साप्ताहिक विंग) यांनी साप्ताहिक पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर महेश जगताप (पुणे – रेडिओ विंग) यांनी, “आवाजाच्या माध्यमातून सकारात्मक संदेश पोहोचवण्याचे हे फळ आहे,” असे सांगितले. डिजिटल माध्यमातील मल्हारी ओमासे (सांगली) यांनी, “हा पुरस्कार तंत्रज्ञानासोबतच मूल्यांचाही गौरव आहे,” असे नमूद केले.

या सोहळ्याला कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, आयुष्यमान समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, शेतकरी नेते रविकांत तुपकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबईचे अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी, ‘पुढारी’ न्यूज चॅनलचे संपादक प्रसन्ना जोशी, ‘लोकशाही’ न्यूजचे संपादक विशाल पाटील आणि ‘जय महाराष्ट्र’ न्यूजचे संपादक प्रसाद काथे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

७८ देशांत ४ लाख ७० हजारांहून अधिक सदस्य असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेने पत्रकारांच्या कल्याणासोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठी उचललेले हे पाऊल मैलाचा दगड ठरणार असल्याचे संयोजक गोरक्षनाथ मदने, विजय चोरडिया, अजितदादा कुंकूलोळ, नरेंद्र देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकार पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button