गडचिरोलीविदर्भ

मुनघाटे महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थिनींची ‘लॉयड्स मेटल्स’मध्ये निवड

रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या उपक्रमाला यश

कुरखेडा : स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन केंद्राने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखविली आहे. गडचिरोली येथील ‘लायर्ड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ आणि कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राद्वारे आयोजित रोजगार मेळाव्यात, महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थिनींची निवड झाली आहे. या निवडीमुळे ग्रामीण भागातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची नवी दारे खुली झाली आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मुनघाटे महाविद्यालयाच्या ज्योती राऊत, सुप्रिया सहारे, सलोनी दोणाडकर, ऐश्वर्या हलामी, प्रणाली गहाणे, सानिका हलामी, निशा पूडो, पूजा नैताम, साधना वटी, श्रुती सहारे आणि रोहिणी पाटणकर या विद्यार्थिनींनी मुलाखती दिल्या होत्या. या सर्व विद्यार्थिनींची निवड झाली असून, सध्या त्यांना गडचिरोली येथे दोन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, रोजगार मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी या निवडीसाठी विशेष प्रयत्न केले. हे केंद्र विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत उपक्रमशील असून, यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत. ‘हमखास रोजगार देणारे केंद्र’ म्हणून या विभागाची परिसरात ओळख निर्माण झाली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे आणि डॉ. अभय साळुंखे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना रोजगाराक्षम बनवण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. या निवडीमुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button