
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील भौतिकशास्त्र विभागात ‘फिजिक्स सोसायटी 25-26’ ची स्थापना नुकतीच उत्साहात करण्यात आली. या सोसायटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, सहकार्य आणि संशोधनाची भावना वाढेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
या स्थापना समारंभासाठी आयआयआयटी नागपूरचे (IIIT Nagpur) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख, डॉ. आतिश दर्यापुरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भविष्यातील संशोधनासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते, तर भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा भाके यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
डॉ. दर्यापुरकर, डॉ. कावळे आणि डॉ. भाके यांनी फिजिक्स सोसायटीच्या स्थापनेचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना संशोधन व प्रयोगशीलतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. नंदकिशोर मेश्राम, डॉ. प्रितेश जाधव आणि विकास पुनसे यांनी नव्याने स्थापन झालेल्या सोसायटीला शुभेच्छा दिल्या.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा देत, शास्त्रीय चिंतन आणि विद्याशाखीय कार्याला गती देण्यासाठी सोसायटी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी फिजिक्स सोसायटी 25-26 च्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष: प्रेमकुमार झाडे, उपाध्यक्ष: तुषा शेडमाके, सचिव: चांदनी मंडल, संयुक्त सचिव: साजन काटपल्लिवार, कोषाध्यक्ष: शुभम झंजाड, सदस्य: श्वेता चेननुरवार, वल्लवी उंदिरवडे, हर्षल हालामी आणि हृतिक भेंडेरे. यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सिमरन बन्सोड आणि प्रिया मेश्राम यांनी केले, तर जानवी बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आगामी काळात शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प केला.



