गडचिरोलीविदर्भ

दारूला नकार, भविष्याला आकार ; दारू नको, भविष्य हवं! : दारू न पिता नववर्षाचे स्वागत करा – नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर

गडचिरोलीत ‘मुक्तीपथ‘ व ‘निर्माण‘च्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली 

गडचिरोली : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असताना, गडचिरोलीतील तरुणांनी मात्र समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. ‘मुक्तीपथ जिल्हा दारूमुक्त अभियान’ आणि ‘निर्माण युवा चळवळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर रोजी शहरात एक प्रभावी व आक्रमक जनजागृती रॅली काढण्यात आली. “नववर्षाचे स्वागत दारूने नव्हे, तर दारू सोडण्याच्या शपथेने करा,” असा ठाम निर्धार या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला.

शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत युवक-युवती, महिला आणि नागरिकांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. “दारू नको – भविष्य हवं”, “दारूमुक्त गडचिरोली, समृद्ध गडचिरोली” अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. थर्टी फर्स्टच्या रात्री होणाऱ्या पार्ट्यांमध्ये दारूचा पूर वाहण्याऐवजी, सामाजिक बांधिलकी जपत युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अत्यंत भावनिक आवाहन केले. त्या म्हणाल्या, “आपल्या जिल्ह्यात अधिकृतपणे दारूबंदी असतानाही अवैध आणि बनावट दारूचा काळा धंदा जोमाने सुरू आहे. या विषारी दारूमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. माझ्या कित्येक भावा-बहिणींचे सुखी संसार या व्यसनामुळे रस्त्यावर आले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आणि गडचिरोली शहर पूर्णपणे दारूमुक्त करण्यासाठी मी नगराध्यक्ष म्हणून कठोर पावले उचलण्यास कटिबद्ध आहे.”

याप्रसंगी  डॉ. अमृत बंग, विलास निंबोरकर, सावदकर (संचालक, मुक्तीपथ), विठ्ठलराव कोटारी, किशोर खोब्रागडे यांच्यासह मुक्तीपथ आणि निर्माण चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजची ही रॅली केवळ एक औपचारिकता नसून, गडचिरोलीच्या सामाजिक आरोग्यासाठी पुकारलेला एक एल्गार होता. दारूमुळे भरकटत चाललेली तरुण पिढी आणि वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा लढा आगामी काळात अधिक तीव्र करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. नववर्षाच्या सुरुवातीलाच असा ठोस संदेश देऊन गडचिरोलीतील युवकांनी संपूर्ण राज्यासमोर एक प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button