
जेसीबीच्या नोंदणीसाठी ७० हजार रुपये लाचेची मागणी ; गोंदिया आरटीओ कार्यालयाजवळ एसीबीची कारवाई
गोंदिया : पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेल्या जेसीबी वाहनाची नोंदणी करण्यासाठी एजंटने थेट ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एजंटला ही रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले असून, या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यालाही आरोपी करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. ४) दुपारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालय परिसरात एजंटच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. राजेंद्र सदाशिव केसकर (५३, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी) व एजंट राजेश रामनिवास माहेश्वरी (५७, रा. रामनगर, गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.
एजंट राजेश माहेश्वरी याने तक्रारदारास (वय ३९) पश्चिम बंगाल येथील जेसीबीची नोंदणी करून देण्यासाठी स्वतःसाठी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्यासाठी टॅक्सव्यतिरिक्त ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने १८ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दिली. १९ नोव्हेंबर एसीबीने पडताळणी केली असता, एजंट माहेश्वरी याने ७० हजार रुपये स्वतः स्वीकारण्यास सहमती दर्शवली, तर २५ नोव्हेंबर रोजी केसकर यांनी माहेश्वरीच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले. गुरुवारी (दि. ४) सापळा लावण्यात आला. एजंट माहेश्वरी याने त्याच्या कार्यालयात तक्रारदारांकडून ७० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता, एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने रंगेहात पकडले. पथकाने माहेश्वरीकडून लाचेचे ७० हजार रुपये रोख, १९ हजार ५० रुपये इतर रक्कम आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.
याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) कलम ७ अ, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे यांनी सहकाऱ्यांसह केली.



