गडचिरोलीविदर्भ

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कायद्याचा जागर! : ‘पोक्सो’ आणि ‘मोफत विधी सेवा’ विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अं. पुं. खानोरकर यांचा पुढाकार; १५१०० टोल फ्री क्रमांकाचा केला प्रसार

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (१८ फेब्रुवारी) कायदेविषयक शिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध कायद्यांवर आणि शासकीय योजनांवर प्रकाश टाकण्यात आला.

या शिबिरात एकूण ८ प्रमुख विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अन्न व शिक्षणाचा अधिकार, पीडित भरपाई योजना, मुलींवरील हिंसाचार निर्मूलन, पोक्सो कायदा (२०१२), नाल्सा ‘डॉन’ व ‘आशा’ योजना-२०२५, महिलांची सुरक्षितता व गोपनीयता, नाल्साची हेल्पलाईन १५१०० आणि आगामी राष्ट्रीय लोकअदालत या विषयांचा समावेश होता.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सहाय्यक न्यायरक्षक अ‍ॅड. स्नेहा मेश्राम यांनी ‘पोक्सो’ कायद्याची गरज आणि व्याप्ती स्पष्ट केली. “महिला व मुलींवरील हिंसाचार रोखण्यासाठी कायद्याने दिलेली शस्त्रे वापरणे गरजेचे आहे,” असे सांगतानाच त्यांनी शिक्षणाचा अधिकार आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) नवीन योजनांची माहिती दिली.

प्रमुख मार्गदर्शक अं. पुं. खानोरकर (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही न्यायापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महिला व मुलांसाठी मोफत कायदेशीर सेवा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी ‘१५१००’ या टोल फ्री क्रमांकाचा प्रसार करावा जेणेकरून गरजूंना वेळेवर मदत मिळेल.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य नितनवरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात कायद्याचे महत्त्व समजावून सांगत सजग नागरिक होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी हकीम, श्रीमती कश्यप यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक एन. आर. भलमे, कनिष्ठ लिपिक जे. एम. भोयर, सागर नंदावार आणि महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button