गडचिरोलीविदर्भ

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी ‘प्रशिक्षित चालक’ ही काळाची गरज! – माजी खा. डॉ. अशोक नेते

शासकीय विश्रामगृहात जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक

गडचिरोली : “गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि दुर्गम जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी केवळ वाहन चालवणारे नव्हे, तर सुशिक्षित आणि प्रशिक्षित चालक घडवणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केले.

गडचिरोली जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. डॉ. अशोक नेते यांनी ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांना मार्गदर्शन करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले: चालकांना केवळ स्टिअरिंगवर नियंत्रण मिळवणे शिकवू नका, तर त्यांना वाहतुकीचे नियम आणि आरटीओ (RTO) नियमावलीचे सखोल ज्ञान द्या. रस्ते सुरक्षेची जाणीव आणि जबाबदारीचे भान असणारा चालकच अपघात टाळू शकतो. शिस्तबद्ध चालक तयार करणे ही समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेली मोठी सेवा आहे.

या बैठकीत जिल्ह्यातील ड्रायव्हिंग स्कूलसमोर असणाऱ्या विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि प्रशासनाशी अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. डॉ. नेते यांनी असोसिएशनला मार्गदर्शन करताना समाजहिताला प्राधान्य देऊन काम करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष रजनीश वालदे, उपाध्यक्ष स्वप्नील वाढई, सचिव रणेन मंडल, सह-सचिव स्वप्नील बामणपल्लीवार, गणेश नेते, प्रदीप हजारे, सुशील वाढई, निलेश बांबोळे, अनिल साखरे, प्रवीण मोडक, यशपाल मोडक, सचिन गुरुनुले, ज्ञानेश्वर बेहरे, सुमित खोब्रागडे, अब्दुल सत्तार रजवी, इशाद शेख, प्रतीक मारवडकर, सचिन सपाटे, मनोज जुवारे, अनिल आकरे, अमित गजभिये व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button