क्राईमगडचिरोलीविदर्भ

इलेक्ट्रिक सामानाच्या गोदामात अवैध दारूसाठा, १५.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त ; पाच आरोपींना अटक

गडचिरोली : आरमोरी शहरातील शेगाव टोली परिसरातील बि.एस.एन.एल टॉवरजवळ असलेल्या एका गोदामावर आरमोरी पोलीस व सहायक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने संयुक्तरीत्या छापा टाकून तब्बल १५ लाख ६५ हजार १८० रुपयांचा अवैध देशी, विदेशी आणि हातभट्टी मोहा दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दारूची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली मारोती कार जप्त करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारासह ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गडचिरोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, सुनील जिभकाटे (रा. शेगाव टोली) हा आपल्या साथीदारांच्या मदतीने दुसऱ्या जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने अवैध दारू आणून आरमोरी येथील आपल्या इलेक्ट्रिक सामानाच्या गोदामात साठवून ठेवत आहे. या माहितीच्या आधारे १० जून २०२६ रोजी एएसपी अनिकेत हिरडे व आरमोरी पोलिसांच्या पथकाने गोदामाजवळ दबा धरला. त्यावेळी ४ ते ५ इसम स्विफ्ट कारमधून दारूचे बॉक्स काढून गोदामात ठेवताना रंगेहाथ आढळून आले. पोलीस पथकाला पाहताच काही आरोपींनी पळ काढला, मात्र पोलिसांनी गोदामात घेरून मुख्य आरोपी सुनील रामचंद्र जिभकाटे (वय ४०, रा. आरमोरी) याला ताब्यात घेतले.

पोलीस पथकाने गोदाम आणि स्विफ्ट कारची कसून झडती घेतली असता, तिथे वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी ‘रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की’च्या १८० एमएलच्या एकूण १४४ सीलबंद बाटल्या (किंमत रु. ५,३५,५००/-). ‘टायगर ग्रँड संत्री’च्या २,६५० प्लास्टिक बाटल्या (किंमत रु. २,१२,०००/-) आणि ‘रॉकेट देशी दारू’चे एकूण ७५ सीलबंद बॉक्स (किंमत रु. ३,५४,४८०/-). ‘रॉयल चॅलेंज प्रिमियम लेजर बियर’चे ३६० टिन (किंमत रु. १,०८,०००/-), ‘किंगफिशर स्ट्राँग बियर’चे १२० टिन (किंमत रु. ३६,०००/-) आणि ‘लंडन पिलसनर बियर’चे २४ टिन (किंमत रु. ७,२००/-). ६० लिटर गावठी मोहा दारू (किंमत रु. १२,०००/-). दारू वाहतुकीसाठी वापरलेली मारोती सुझुकी स्विफ्ट कार (किंमत अंदाजे ३ लाख रुपये). असा एकूण १५ लाख ६५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ६५(ई), ९८, ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सुनील जिभकाटे (रा. शेगाव टोली, आरमोरी), अजय दादाजी राऊत (वय ४०, रा. अंतरजी, आरमोरी), राहुल राऊत (वय Lifespan ३५, रा. रामाळा, आरमोरी, अजय राऊत (वय ३०, रा. रामाळा, आरमोरी), सुभाष तुलावी (वय २८, रा. दंवडी, ता. धानोरा) यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपी सुनील जिभकाटे याला एका दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली असून, फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे, नरेश सहारे, पोलीस हवालदार पिल्लेवान, वालदे, पोलीस अंमलदार कुमोटी, रामटेक, आभारे, सराटे आणि चालक विस्कडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button