गडचिरोलीविदर्भ

पोटेगावजवळ भीषण अपघात, दुचाकीस्वार दोघे जागीच ठार

सावेला-मारोडा रस्त्यावर मालवाहू वाहनाची धडक

गडचिरोली : पोटेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सावेला ते मारोडा रस्त्यावर आज (सोमवार, ९ जून) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली.

या अपघातात अनुराग रैजी मडावी (वय २८, रा. कसनसुर) आणि दिवाकर विठ्ठल उसेंडी (वय ३२, रा. फुलबोडी) हे दोघे ठार झाले. मारोडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जंगलरोडवर हा अपघात घडला. गडचिरोलीहून पोटेगावकडे जाणारी एमएच ३३ टी ३६९३ क्रमांकाचे वाहन आणि पोटेगाववरून गडचिरोलीकडे जाणारी एमएच ३३ एएच ३०५० क्रमांकाची दुचाकी यांच्यात ही धडक झाली.

अपघाताची भीषणता इतकी होती की, दुचाकीचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता आणि दुचाकी मृतांच्या अंगावर पडली होती. घटनेची माहिती मिळताच मारोडा आणि सावेला येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील सीमा मेश्राम यांनी तात्काळ पोटेगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. कर्तव्यदक्ष पोटेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका बोलावण्यात आली तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस पाटील सीमा मेश्राम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुजुमकर (पोटेगाव) आणि सुरेश उसेंडी यांनी पोलिसांना सहकार्य केले. अपघातानंतर वाहन चालक पसार न होता, लोकांनी त्याला अडवून धरले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात नेले आहेत. पोटेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button