गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

पोलिसांनी अतिदुर्गम लिंगापूर टोला येथे श्रमदानातून उभारला पूल; पावसाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा

झिंगानूर उपपोस्टे आणि एसआरपीएफ जवानांचा समाजाभिमुख उपक्रम

गडचिरोली : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आले असून, वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत, उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील अतिदुर्गम लिंगापूर टोला गावाजवळील नाल्यामुळे संपर्क तुटत असल्याने नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. झिंगानूर उपपोस्टे आणि एसआरपीएफच्या जवानांनी श्रमदान करत एक तात्पुरता पूल उभारला आहे, ज्यामुळे येथील नागरिकांची वाहतूक समस्या सुकर झाली आहे.

लिंगापूर टोला ही एक छोटी वस्ती असून, पावसाळ्यात गावाजवळच्या नाल्याला पाणी आल्याने नेहमी इतर गावाशी संपर्क तुटत असे. यामुळे वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचण्यास अडचण निर्माण होत होती, तर शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत होते. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, २८ जुलै रोजी अभियानादरम्यान उपपोस्टे झिंगानूर येथील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि एसआरपीएफच्या अंमलदारांनी एकत्र येत श्रमदान केले. त्यांच्या अथक प्रयत्नांतून एक नवीन पूल तयार करण्यात आला आहे.

या पुलामुळे आता लिंगापूर टोला येथील नागरिकांना ये-जा करणे सोपे झाले आहे. गडचिरोली पोलिसांच्या या समाजाभिमुख कार्यामुळे येथील नागरिकांच्या मनात पोलीस दलाबाबत एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबद्ध आहे, हे या उपक्रमाद्वारे अधोरेखित झाले आहे.

सदर उपक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. उपपोस्टे झिंगानूरचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अभिजीत घोरपडे, पोउपनि. ओंकार हेगडे, पोउपनि. अनिकेत खोपडे व इतर अंमलदार, तसेच एसआरपीएफच्या अंमलदारांनी या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button