गडचिरोलीविदर्भ

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नरेंद्र उंदीरवाडे यांचे यश

प्रयोगशाळा सहाय्यक गटात पटकावला प्रथम क्रमांकाचा मान ; एकाच उपकरणाद्वारे अनेक विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण

गडचिरोली : येथील विद्याभारती कन्या विद्यालय येथे आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री. नरेंद्र उंदीरवाडे यांनी आपल्या कल्पकतेची मोहोर उमटवली आहे. त्यांनी सादर केलेल्या “ऑल इन वन” या नाविन्यपूर्ण प्रायोगिक साधनाने प्रयोगशाळा सहाय्यक गटातून प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यातून गौरव प्राप्त केला.

या प्रदर्शनात नरेंद्र उंदीरवाडे यांनी सादर केलेले “ऑल इन वन” हे उपकरण सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. विज्ञान विषयातील विविध कठीण प्रयोग एकाच साधनाच्या माध्यमातून अत्यंत सुलभतेने करता येतात. प्रयोग करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी या उपकरणाद्वारे घेतली जाते. उंदीरवाडे यांनी या उपकरणाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन ते शालेय स्तरावर कसे उपयुक्त ठरू शकते, याचे अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण दिले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेची परीक्षक मंडळाने विशेष प्रशंसा केली.

प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकुंद म्हशाखेत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. नरेंद्र उंदीरवाडे यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विज्ञान प्रेमी उपस्थित होते.

नरेंद्र उंदीरवाडे यांच्या या यशाबद्दल गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे आणि पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करताना विज्ञानाप्रती असलेली त्यांची आवड आणि जिद्द इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे आता उंदीरवाडे यांची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button